जामखेड येथे पीक कापणी प्रयोगानंतर नुकसानभरपाई म्हणून पिकविम्याचे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १६८.३६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. राम शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्या नंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीकविमा या योजनेच्या धर्तीवर एक रुपयात पिकविमा ही योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे कर्जत व जामखेड, या दोन्ही तालुक्यांमध्ये खरीप २०२३ हंगामामध्ये झालेल्या पीकविमा नुकसान भरपाईपोटी दोन्ही तालुक्यासाठी १६८.४४ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली असून, रक्कम पिक कापणी प्रयोगानंतरची आहे.
कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यांत या योजनेंतर्गत पिक नुकसान भरपाई अग्रीम रक्कम म्हणून १०.४२ कोटी रुपये व शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केल्यानंतर २.६६कोटी रुपये एवढी रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे.
पिक कापणी प्रयोगानंतरची मंजूर झालेली पिक विमा नुकसान भरपाई रककम राज्य सरकार आणि विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्याने जमा करणार आहे.
एक रुपयात पिकविमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच आणि एकमेव राज्य आहे. कोणत्याही संकटाचा शेतकऱ्यांना सामना करता यावा म्हणून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
एक रुपयामध्ये पिक विमा योजना आणून कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे, असे शेतकऱ्यांना अश्वासित केले आहे. या अगोदरही कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पिकविमा नुकसान भरपाई २५% अग्रीम रक्कम देण्यात आली होती.
तसेच शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा नुकसान भरपाई जमा झालेली आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे पिक विमा नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत आहे, त्यामुळे विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा टोला आ. शिंदे यांनी कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींचे नाव न घेता लगावला आहे.