Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत खोदण्यात येणाऱ्या नवीन विहिरीच्या कामाला गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, याबाबत पाथर्डीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाईपलाईन व नवीन विहिरीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने नवीन विहीर खोदण्याचे नियोजन केले आहे, त्या ठिकाणी पूर्वीची विहीर असून, त्या विहिरीला मुबलक पाणी आहे.
असे असताना ग्रामपंचायतीने आणखी एक नवीन विहीर याच परिसरात खोदण्यासाठी आडमुठेपणाची भूमिका घेतली असून, या नवीन विहिरीमुळे परिसरातील काही शेतकऱ्यांचा रस्ता बंद होवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
इतरत्र विहीर खोदण्यासाठी जागा उपलब्ध केवळ राजकीय द्वेषापोटी नवीन विहीर खोदण्याचा घाट घातला जात आहे. नवीन विहिरी खोदण्यासाठी ग्रामपंचायतने इतरत्र जागेचा विचार करावा
तसेच स्थानिक वादामुळे परिसरातील शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये, अशी मागणी शेतकरी प्रशांत शिदोरे, सुधाकर खंडागळे, अप्पासाहेब लबडे, मच्छिद्र लवांडे, महेश शिदोरे, संदीप शिदोरे, अजित शिदोरे, गीताबाई शिदोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.