Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील नव्याने सुरू होत असलेल्या व भूसंपादन प्रक्रिया सुरू असलेल्या जमिनीतून बागायती जमिनी वगळाव्यात. अशी मागणी पळवे बुद्रुक व बाबुर्डी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१५ – २०१६ मध्ये आमच्या जमिनीच्या ७/१२ वर भूसंपादनाचे शिक्के टाकण्यात आले. त्यास आम्ही त्वरित भूसंपादन झालेल्या बागायती व अन्नधान्य पिकवणार्या जमिनीस ग्रामसभेद्वारे हरकत दर्शविली आहे.
याशिवाय वेळोवेळी अनेक निवेदनाद्वारे भूसंपादनास सन २०१८ मध्ये हरकत म्हणून आम्ही खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. सन २०१९ मध्ये रिट याचिकेचा निर्णय आला व त्यामध्ये हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन महिन्यांमध्ये विचार करण्यास सांगण्यात आले होते.
परंतू तीन महिन्यांमध्ये कुठलाही निर्णय न दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केलेली आहे. व ती उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे. दि.६ रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंपादनास पूर्णपणे विरोध केला आहे.
निवेदनावर शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे, शिवाजी चौधरी, खजिनदार राजेंद्र कळमकर, सुरेश भगत, बाळासाहेब पळसकर, गोरक्ष कळमकर यांच्यासह सुमारे ५८ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.