यंदा शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापसाला पसंती; सोयाबीनची १७३ तर कापसाची १०७ टक्के पेरणी

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : यंदा जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात चांगला व वेळेवर पाऊस झाला. त्यानंतर मध्यंतरी आर्द्रात देखील पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या जवळपास उरकल्या आहेत. आतापर्यंत जवळपास १०३ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षी आजमितीस फक्त १५ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी जिल्ह्यातील ५ लाख ९६ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला अधिक पसंती दिली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १७३ तर कापसाची पेरणी १०७ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा फक्त ४३ टक्के झाला आहे.

यंदा जून महिन्यात सरासरी १७७ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरणीजोगे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी धावपळ केली. त्यामुळे दीड महिन्यामध्येच १०३ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. सोयाबीनसाठी ८७ हजार ३३० हेक्टर क्षेत्र असताना शेतकऱ्यांनी १ लाख ५१ हजार १९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे.

कापसासाठी १ लाख २२ हजार ८७ हेक्टर क्षेत्र निश्चित असताना आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचा
पेरा फक्त ४३ टक्के असून, मक्याचा पेरा मात्र, ११३ टक्के झाला आहे.

तूर, मूग व उडीद या कडधान्याची देखील मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. ६३ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. हा पेरा १७५ टक्के इतका नोंदविला गेला आहे. मुगाची पेरणी ४८ हजार २०० तर उडदाची पेरणी ५७ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

या दोन्ही कडधान्याचा पेरा अनुक्रमणे १०२ आणि १४३ टक्के इतका झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe