अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.
याचाच भाग म्हणून श्रीरामपूर मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.
केंद्र शासनाने शेतकर्यांवर जाचक असे आणलेले तीनही कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. श्रीरामपूर शहरातील स्टेशनजवळील हनुमान मंदिरापासून हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात नगराध्यक्ष अनुराधा आदिक, शेतकरी बांधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या 62 दिवसांपासून दिल्ली येथे देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते.
त्याला प्राथमिक स्वरुपात पाठींबा म्हणून श्रीरामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र कृषक समाजाच्यावतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.