अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्याने पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली सुमारे एक लाख रुपये किंमतीची २१ क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील शेतकरीगणेश गाढवे यांनी खरीप हंगामात सोयाबीन पीक केलं होतं. सोयाबीन पिकाने त्यांना चांगली साथ दिल्याने जवळपास २१ क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन झाले होते.
हे सर्व सोयाबीन त्यांनी २९ गोण्यांमध्ये भरून आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनला असलेली जाळी पाठीमागच्या बाजूने कापून सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्या.
या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांच्या कोंबड्या- बकऱ्या तसेच विहिरीतील मोटारी तसेच कांदाचाळ आदी चोरी झाल्या होत्या. मात्र आता हातातोंडाशी आलेले पीकसुद्धा चोरट्यांनी पाळवल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.