दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत.
अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादक व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खासगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे; मात्र राज्यातील १४ टक्के दूध खासगी दूध संघांच्या वतीने संकलित होते. खासगी दूध संघांना असा भाव देण्याबद्दल बंधन घालण्याचा कोणताही अधिकार कायद्याने राज्य सरकारला नसल्यामुळे असे शासन आदेश निघतात; परंतु त्याची अंमलबजावणी दुध संघ करत नाहीत.
यापूर्वीही असे अनेकदा अनुभव आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यावेळी काढलेला शासन आदेशसुद्धा अशाच प्रकारे फसवा असून खासगी दूध संघ या आदेशाची अंमलबजावणी करतील याची बिलकुल शक्यता नसल्यामुळे शेतकरी राज्य सरकारच्या या शासन आदेशावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाची घोषणा केली आहे; मात्र मागील वेळीही अशा प्रकारचे अनुदान देण्यात आले, ते केवळ राज्यातील २० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. अटी शर्तीमुळे बहुतांशी शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले.
नवीन काढलेल्या अनुदान आदेशातसुद्धा मागील अटी शर्ती तशाच ठेवण्यात आल्यामुळे यावेळीही अनुदान शेतकऱ्यांना मिळेल याची सुतराम शक्यता नसल्यामुळे अनुदान नको ४० रुपये भाव शेतकऱ्यांना द्या, अशा प्रकारची भूमिका राज्यभरातील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.
कोतुळ आंदोलनात याच भूमिके नुसार आंदोलन सुरू करण्यात आले असून पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भांगरे यांनीही आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनाचे नेतृत्व पंचक्रोशीतील शेतकरी करत असून सर्वांना एकत्र करण्यासाठी कॉ. सदाशिव साबळे, सागर शेटे, बाळासाहेब देशमुख, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, निलेश तळेकर, संजय साबळे आदी परिश्रम घेत आहेत