Ahmednagar News : अवर्षणप्रवण भाग असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा,
यासाठी स्वतः प्रयत्न करून शेतकऱ्यांना गावांमध्ये जाऊन मोफत पिक विमा संरक्षण उतरवून दिले. त्याचाच फायदा हा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होत असताना आता पाहायला मिळत आहे.
सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये पावसाचा खंड पडल्याने शेतकयांचे अतोनात नुकसान होत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून,
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के गट अपेक्षित असावी व त्या अनुषंगाने राज्यशासन,
विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संयुक्त सर्वेक्षण करतात व त्यांच्या अहवालानुसार येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे.
त्यानुसार कर्जत- जामखेड मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण झाले होते आणि त्याबाबतचा प्रस्तावदेखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता; परंतु त्याला मंजुरी मिळत नव्हती. यासाठी आ. पवार यांनी काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती केली होती.
त्यानुसार या मागणीला आता यश आले असून, आ. पवार यांच्या मागणीनुसार आता अधिसूचना जाहीर करून कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. याचा फायदा हा आता संपूर्ण जिल्हाला होणार आहे.
सध्या पावसाचा मोठा खंड पडल्याने व यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी,
यासाठी मी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती तसेच मतदारसंघातील शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी मंत्री महोदयांचे व प्रशासनाचे आभार मानतो. आ. रोहित पवार