शेतकऱ्यांची चिंता वाढली !गुलाब चक्रीवादळाने शेतीचे मोठे नुकसान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  गुलाब चक्रीवादळानं संपूर्ण राज्याला लक्ष्य केलं असून, याचा सर्वाधिक फटका दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे ११ लाख हेक्टरवरील उभी पिकं हातची गेली आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांची चिंता वाढली असली, तरी दुसरीकडे राज्यातील सुमारे ३६ धरणे १०० टक्के भरली असून, ती ओव्हर फ्लो होत आहेत.

गेल्या काही वर्षांत एवढा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याची ही पहिलीच घटना आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मोठ्या पावसामुळे दुष्काळग्रस्त गावांची संख्याही घटली असून,

टँकरने पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या अवघ्या सहावर येऊन ठेपली आहे. राज्यातील ३,२६७ छोट्या-मोठ्या धरणांमध्ये सुमारे ८३ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीला आहे.

यात अमरावती विभागात ९७ टक्के, औरंगाबाद विभागात ८९ टक्के, कोकण विभागात ९९ टक्के, नागपूर विभागात ८९ टक्के, नाशिक विभागात ९२ टक्के तर पुणे विभागात ९३ टक्के पाणीसाठ्याची नोंद आहे.

विशेषता दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील सर्वच धरणांमध्ये सरासरी ९५ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. या पाणीसाठ्याचा २०२२च्या उन्हाळ्यापर्यंत उपयोग होईल, असे वर्तवण्यात येत आहे.

मात्र गुलाब चक्रीवादळाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, राज्यावर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निधी उभा करावा लागणार आहे.

राज्यावर गेल्या काही महिन्यांपासून चक्रीवादळांची संकटांची मालिकाच सुरु आहे. निसर्ग, तोक्ते आणि आता त्यानंतर गुलाब चक्रीवादळाच्या फटक्याने राज्यातील सर्वच भागातील शेतकरी कोलमडून पडला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!