अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : धनगर आरक्षणासाठी चौंडीत आमरण उपोषण !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) समावेश करण्यासाठी वटहुकूम काढावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने दि. ६ रोजी जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथील स्मारकस्थळी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जोपर्यंत वटहुकूम निघत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिला आहे.

त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात जशा राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तशाच चौंडीत धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणीही दिल्या जाणार आहेत.

कर्जत-जामखेचे आमदार रोहित पवार उद्या येथे येऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. धनगर आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहो. या केंद्र सरकारने ३७० वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत, असे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत.

राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्तेत आणण्यासाठी धनगर बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापुढे बोलताना फडणवीस म्हणाले होते की, धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला असून, आमचे सरकार आले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्ग लावू.

मात्र, फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाचे इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे, असेही बाळासाहेब दोडतले म्हणाले.

दि. १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनु. जमातीमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीचा वटहुकूम काढवा व यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. या मागणीसाठी आम्ही बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा जीआर काढूनदेखील आरक्षण मिळाले नाही, मेंढपाळ समाज भटकत असतो, त्यांला व त्याच्या मेंढपाळांना संरक्षण द्यावे, आम्हाला सरकार न्याय देत नाही, केंद्र सरकार न्याय देत नाही, मग आमचे प्रश्न कोठे मांडायचे. त्यामुळे उपोषण सुरू केले आहे. आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office