अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मुरबाड कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महामार्गावरील जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर खड्डे भरावे, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.’

माळशेज घाट रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सर्वात जास्त रहदारी असलेल्या मुरबाड-कल्याण रस्त्यावर गोवेली, वांजळे अशा बऱ्याच ठिकाणी वाहनचालकांना त्रास होतो.

मुरबाड तालुक्यातील सरळगाव इंदिरावाडी येथे मोठा खट्टा पडला असून, या खड्यांमध्ये इंदिरावाडी या गावातील शिक्षक संतोष वाघ यांचा अपघात झाला. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने खड्ड्यांमध्ये झाड लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपतालुकाप्रमुख योगेश हरड, तालुका संघटक गुरुनाथ घुडे, पदाधिकारी जय घुडे, गुरू जोशी, निखिल निमसे, सतीश घुडे, केतन घुडे, दीपक खापरे तसेच इंदिरावाडी गावातील संतोष वाघ, रमेश हिलम हे उपस्थित होते.

गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असून, याहीवर्षी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गणरायाचे आगमन खड्डड्यांतून होणार असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत असून, वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्ते वाहून गेल्याने ठेकेदारांच्या कामच्या गुणवत्तेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत.

या महामार्गावरून रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे, लहान मुले, गरोदर स्त्रिया किंवा वयोवृद्धांना खड्डयांच्या रस्त्यांवरून नेणे म्हणजे त्यांच्या सुटकेची तत्पर व्यवस्थाच करणे होय. खड्यांमुळे वाहतूक कोंडी होते.

खड्डे बुजवण्याचे काम सुरूच असून पावसामुळे खड्डे भरायचे थांबलेले काम पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सुरू केले आहे. आता सद्यस्थितीला खड्डे भरायचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वीच या महामार्गावरील खड्डे भरले जातील.

खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने एकमेकांवर आदळतात. वाहनांचे नुकसान होते. त्यातील चालक आणि प्रवासी जखमी होतात. प्रसंगी एखाद्याच्या जीवही जातो.

रस्ता कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी विशिष्ट व्यवस्था आहे, रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यावर ती व्यवस्था देखरेख करते, असे सांगितले जाते, पण त्याचा अनुभव लोकांना क्वचितच येतो.