अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती यावेळी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजलेली अशोकनगर व निपाणी वडगाव ग्रामपंचायत निवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
या निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असून काळ्या फिती लाऊन मतदानाच्या दिवशी शांत बसणार आहे. प्रत्येक निवडणुकीच्यावेळी
गावपुढारी विकासाचे पोकळ आश्वासन देतात व निवडून आले की काम तर बाजूला राहते परंतु सर्वसामान्य नागरिकांना उद्धट बोलून दमदाटी देऊन गप्प बसवतात.
ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या पदाधिकार्यांच्या निष्क्रीयतेला कंटाळून आम्ही नागरिकांनी होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉर्डात रस्ते नाही, लाईट नाही, साईड गटार नाही, कचरा कुंडी नाही, कुठलेही विकासाचे काम होत नाही. येणारा निधी त्यांचा मर्जीतील लोकांच्या सांगण्यावरून खर्च केला जातो, सर्वसामान्य मतदार मात्र नागरी सुविधेपासून वंचित राहतो.
नागरिकांच्या नागरी सुविधेकडे कोण लक्ष देणार? त्यांना सुविधा कोण देणार? असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे मतदान न केलेले बरे अशी भावना सर्वसामान्य मतदारांची झाली आहे.