अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-ओम संजय पाबळे (वय १५) या मुलाचा भंडारदरा धरणाच्या गेट खालील एका खड्ड्यातील शेवाळावरून पाय घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अकोले तालुक्यातील गर्दनी येथे रविवारी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत ओम व त्याची आई, वडील, भाऊ आणि त्याच्या मामाची मुलगी असे भंडारदरा येथे फिरण्यासाठी गेले होते. या सर्वांनी भंडारदरा जलाशयात बोटिंग केली.
त्यानंतर ओमच्या वडिलांच्या मित्राकडे गेले. तेथे जेवण केले. जेवण झाल्यावर ही मुले धरणाच्या स्पीलवे गेट खालील खडकावर फिरण्यासाठी गेले. तेथे असलेल्या खड्ड्याच्या कडेला शेवाळावरून ओमचा पाय घसरला आणि तो पाणी असलेल्या खड्ड्यात पडला.
यावेळी त्याच्या नाका तोंडात पाणी गेले. त्यांच्या आईला ही बाब समजताच तिने व तिच्या सोबत असलेल्या महिलेने धावपळ करीत राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अगोदरच ओमचा मृत्यू झाला होता, राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.