अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- आपला व आपल्या बाळाचा जीव घेण्यासाठी समोर बिबट्या उभा असतानाही धाडसाने त्यास पिटाळून लावण्याचा थरार अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथील रहिवासी महिला रंजना सुनील भांगरे यांनी केला.
आपल्या जीवितास पर्वा न करताच बाळाच्या सुरक्षिता राखण्यात बिबट्यावरच चाल करून जाणाऱ्या एका आईच्या मातृत्वाची येथे प्रचिती आली.
सायंकाळी सहाच्या सुमारास घराच्या दरवाजातून समोरून बिबट्याला पिटाळून लावत आपल्या बाळासाठी हिरकणीची आठवण करून दिली. नववर्षांतील पहिल्याच दिवसाची सायंकाळची वेळ होती.
घरातील कामधंदा आटोपून रंजना आपल्या धनश्री (वय २ वर्ष) सोबत घरात खेळत होत्या. अचानक घराच्या आवतीभोवती ‘काळ्या’ नावाचा कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला.
त्यांनी त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केले. घरात रंजना आपल्या तान्हुलिला धनश्रीला काखेत घेऊन टीव्ही पहात होत्या. टिव्हीच्या आवाजाने बाहेरील झालेली कालवाकालव लक्षात आली नाही.
उघड्या दरवाजातून बिबट्या आत आला. त्यांना बिबट्याचे समोरासमोर दर्शन झाले. प्रसंगावधान राखून रंजना सावध झाल्या. रंजनाच्या अवघ्या पाच फुटावर बिबट्या होता.
ताकद लावून रंजनाने जवळची खुर्ची बिबट्यावर भिरकावली. त्यानंतर रंजना पुढे झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेऊन बिबट्यावरच हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. अशा परिस्थितीत रंजनाने हिरकणी होत आपल्या धनश्रीचा, कुत्र्याचा व आपलाही जीव वाचवला.