Ahmednagar News : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई असून आपण ती जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.
खासदार लोखंडे यांच्या मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पहिल्या टप्प्यात शहरातील विविध सामाजिक संघटना, मंडळे यांच्यासह व्यापारी वर्गाच्या भेटीवर जोर द्यायला सुरूवात केली आहे.
खासदार लोखंडे शिर्डी, संगमनेर या शहारांतील मतदारांच्या भेटी घेत आपण केलेल्या विकास कामाची माहिती देत आहे. संगमनेर मध्ये खासदार लोखंडे कार्यकर्त्यांबरोबर चंद्रशेखर चौकातील मोठा मारुती मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरूवात केली.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रचारात आपण केलेल्या कामावर भर द्यायला सुरूवात केली आहे. संगमनेर मध्ये म्हाळुंगी नदीवरील पुलाला साडेचार कोटींचा दिलेला निधी, योगा भवन, भाजी मंडईत भाजीपाल्याचे नुकसान टाळण्यासाठी तीन ठिकाणी कोल्डस्टोरेज सुविधा उभारण्यात आले आहे.
नगरपालिका हद्दीतील शाळा डिजीटल शाळा करण्यासाठी संगणक पुरवठा, फ्युचरिक क्लास रूम, खेळाचे साहित्य, यासाठी सौर उर्जा यंत्रणा, हायमॅक्स, त्रिमूर्ती चौक, जयहिंद चौक, भूमी अभिलेख चौक सुशोभीकरण आदी केलेली कामे सांगण्यावर खा. लोखंडे यांनी भर दिला.
दरम्यान, राममंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा, तीन तलाक, राष्ट्रीय सुरक्षेच्या या सारखे मुद्दे देखील प्रचाराच्या केंद्रस्थानी त्यांनी ठेवले आहे. निळवंडेचे पाणी जर पूर्ण क्षमतेने आले तर बाजारपेठेवर त्याचे चांगले परिणाम होतील, हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू, असेही खासदार लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपील पवार, आबासाहेब थोरात, भाजप शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे बाजीराव दराडे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, शशांक नामन, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, राम जाजू, दिपक भगत, दिनेश फटांगरे, सनी धारणकर, सोमनाथ भालेराव, मुंज्याबापू साळवे, महिला आघाडीच्या दिपाली वाव्हळ, वैशाली तारे आदी उपस्थित होते.
कोल्डस्टोरेज थेट भाजी मंडईत
भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्रीसाठी जेव्हा ठेवला जातो तेव्हा तो बाहेरील वातावरणामुळे खराब होतो. अशावेळी मोठे नुकसान होते. ग्राहकालाही फ्रेश भाजीपाला मिळत नाही व विक्रेत्याचे होणारे नुकसान टाळल जावे. तसेच नागरिकांना भाजीपाला फ्रेश मिळावा, म्हणून प्रत्येक नगरपालिका हद्दीत भाजी मंडईत कोल्ड स्टोरेज संच बसविण्यात आले आहे, असेही खा. लोखंडे यांनी सांगितले.