त्या शाळेविरोधात राज्य मानव अधिकार आयोगाकडे केस दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉनबॉस्को विद्यालयाच्या विरोधात राज्य मानव अधिकार आयोगाकडे केस दाखल झाली असल्याची माहिती प्रा.पंकज लोखंडे व सोन्याबापु भाकरे यांनी दिली. तर या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा तक्रारदार पालकांनी व्यक्त केली आहे.

सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाने 17 जानेवारी 2019 रोजी शिक्षण विभागाच्या परवानगीविना खाजगी बसणे (लक्झरी) वसई विरार येथे बेकायदेशीर सहल नेली होती. प्रवासामध्ये आळेफाटा (जि. पुणे) परिसरात सदर बसचा अपघात होऊन त्यामध्ये या शाळेचा एक शिक्षक, लक्झरी बसचा क्लिनर,

अपघात ग्रस्त टेम्पोचा ड्रायव्हर अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातामध्ये 22 ते 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता खाजगी लक्झरी बसने शालेय विद्यार्थ्यांची सहल काढणे, सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर कृत्य होते.

हा ठपका ठेवत शिक्षण विभागाने चौकशीमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आणि इतरांना दोषी ठरवले आहे. मात्र सदर संस्थेने अथवा शिक्षण विभागाने सदर मुख्याध्यापक व इतर दोषी व्यक्तीवर या अपघाताची गंभीरता लक्षात न घेता कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

तीन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले व 22 ते 25 विद्यार्थ्यांना गंभीर इजा पोहचविणारी घटना गंभीर स्वरुपाची आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, सहल प्रमुख व या घटनेशी संबंधीतांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती.

सदर प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल न घेतल्याने पालकांनी राज्य मानव अधिकार आयोगाकडे दाद मागितली. सदर प्रकरण आयोगाने दाखल करुन घेतले आहे. संबंधीतांवर कारवाई होण्यासाठी पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, राजू भिंगारदिवे प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24