अहमदनगर बातम्या

नागवडे कारखान्याचे संचालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असताना, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क, ब व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम ३ परिपत्रकानुसार,

सहकारी संस्थाचे सेवक या शीर्षकाखाली ज्या सहकारी संस्थेची निवडणूक घोषित झाली, त्या सहकारी संस्थेचे सेवक संस्थेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेणार नाहीत.(Nagwade Sugar Factory)

प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनेलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये, असा आदेश असतानाही नागवडे कारखान्याचे सेवक व कारखाना अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेतील सेवक शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनेलचा प्रचार करत आहेत.

हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केली.

आचारसंहिता लागू असलेल्या कार्यक्षेत्रात अथवा कार्यक्षेत्राबाहेर संस्थेच्या खर्चाने दौरे करू नयेत, संस्थेच्या विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास अथवा इतर कोणासही आचारसंहिता कालवधीत करता येणार नाही.

सहकारी संस्थेची वाहने व कर्मचारीवर्ग यांचा निवडणुकीच्या कामकाजासाठी विद्यमान पदाधिकारी व संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत वापर करू नये, या नियमाचेही विद्यमान पदाधिकारी व संचालक यांचेकडून उल्लंघन होत आहे.

ही बाब गंभीर असून तत्काळ चौकशी करून आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे संदीप नागवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, नागवडे सहकारी साखर कारखाना, तहसील कार्यालय यांच्याकडे केली.

कारवाई न केल्यास सर्व पुरावे कोर्टात सादर केले जातील. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यास त्यास सर्वस्वी कामगार व शिक्षण संस्थेतील सेवकच जबाबदार राहतील, असा इशारा नागवडे यांनी दिला.

याबाबत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, आम्ही कोणतेही पदाधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाला लावले नाही.

त्याप्रमाणे गेस्ट हाऊसमध्ये कोण बसत, कोण उठतं, तिथं काय चालतं हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शहानिशा करावी, असे सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office