अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-अर्बन बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २२ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आली.
बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात अर्बन बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवारी (दि.२१) आंदोलन करण्यात आले.
श्री.मिश्रा यांनी या प्रकरणी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात बॅंक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, पोपट लोढा, सदाशिव देवगावकर, मनोज गुंदेचा,
अतुल भंडारी, भैरवनाथ वाकळे, रवींद्र सुराणा, रुपेश दुग्गड, राहुल लोढा आदी सहभागी झाले होते. नगर अर्बन को-ऑप. बॅंकेची पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे शाखा आहे.
या शाखेत २२ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, या प्रक्रियेत दोन कंपन्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, असा आरोप बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आला आहे.
२६ मार्च २०१८ ला कर्ज प्रकरणासाठी एका व्यक्तीचे दोन अर्ज आले होते. त्यानंतर दोनच दिवसात संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी रात्री ११ वा. बॅंक उघडण्यात आली, असा आरोप राजेंद्र गांधी यांनी केला.
२२ कोटीचे कर्ज मंजूर करून देताना यातील ११ कोटी रुपये संबंधित पदाधिकाऱ्यांनी घेतले असल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असे ठोस आश्वासन श्री.मिश्रा यांनी दिले.