Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले असून त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यात एकच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे आज मंगळवार रोजी या विधानसभा निवडणुकी संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे व 29 ऑक्टोबर 2024 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
विधानसभेसाठी आजपासून भरता येणार अर्ज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भातली अधिसूचना आज प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर राज्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 12 प्रशासकीय ठिकाणी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.
यासाठी उमेदवारांना अनामत रक्कम भरणे गरजेचे असून खुला प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
या सगळ्या प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली असून यामध्ये मतदान केंद्र तसेच त्यासाठी लागणारे मतदान यंत्र, फिरते पथक, आचारसंहिता अंमलबजावणी पथक व जिल्ह्याच्या बऱ्याच मार्गांवर तपासणी पथके देखील नियुक्त करण्यात आलेली आहेत.
प्रशासनाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल करण्याची सुविधा उमेदवारांना करून देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा उमेदवार अर्ज दाखल करायला येतील तेव्हा त्यांच्यासोबत फक्त पाच जणांना कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच उमेदवार प्रचाराकरिता ज्या वाहनांचा वापर करतील त्या वाहनांची परवानगी घेणे आवश्यक असून संबंधित परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदार संघामध्ये एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कल्याण नगर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याकरिता स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीत जवळपास एक लाख 971 नवीन मतदारांची भर पडली असून जिल्ह्यातून एकूण 37 लाख 60 हजार 512 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी करता येणार अर्ज दाखल
1- अकोले विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय अकोले या ठिकाणी दाखल करता येणार अर्ज
2- संगमनेर
विधानसभा मतदारसंघ– उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर या ठिकाणी दाखल करता येणार अर्ज3- शिर्डी विधानसभा मतदारसंघ– तालुका प्रशासकीय इमारत राहता या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
4- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
5- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ– उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
6- नेवासा विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय नेवासा या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
7- शेवगाव विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय शेवगाव या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
8- राहुरी विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय राहुरी या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
9- पारनेर विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय पारनेर या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
10- अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
11- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार
12- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ– तहसील कार्यालय कर्जत या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार