अखेर ‘तो’ साखर कारखाना रोहित पवार यांच्याकडे आला! कर्जत जामखेडकारांना होणार फायदा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे.

राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. नुकत्याच मुंबईत राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना “बारामती ऍग्रो’कडे देण्यात आला.

गेली १५ वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्‍मी बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकाअंतर्गत एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप अशा कारणांमुळे हा कारखाना अडचणीत येत गेला.

मुंबईत आज झालेल्या लिलाव प्रक्रियेत “बारामती ऍग्रो’ने हा कारखाना चालविण्यास घेतला. आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमधील २५ गावांचे कार्यक्षेत्र आदिनाथ कारखान्यात असल्याने याचा चांगला राजकीय फायदा रोहित पवार यांना मिळू शकणार आहे.

भाजपचे माजी मंत्री आणि राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले असले, तरी मतदारसंघ बांधण्यासाठी हा कारखाना त्यांना राजकीयदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24