अखेर देवळाली प्रवरातील ‘त्या’ सावकाराच्या वस्तीवर छापा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणास व्याजापायी आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या त्या आडते व्यापारी सावकाराच्या देवळाली प्रवरा येथील वस्तीवर राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दीपक नागरगोजे यांच्या पथकाने पोलीस फौजफाट्यासह छापा टाकला.

यावेळी काही खरेदीखत आणि काही रोकड घरातून हस्तगत करण्यात आली. दरम्यान, त्या सावकाराच्या वस्तीवर केवळ महिलाच होत्या. नंतर संबंधित अधिकार्‍यांनी तेथील घरातील कर्त्या पुरूषांना बोलाविण्याचे आदेश दिले.

मात्र, तेथे प्रत्यक्षात तो सावकार त्या ठिकाणी फिरकला नाही. या घटनेमुळे खासगी सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणाने त्या व्यापारी असलेल्या सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून वेळेवर उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सुधारली.

या खासगी सावकारावर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले.

त्यामुळे राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दीपक नागरगोजे यांनी संबंधित सावकाराच्या घरावर छापा टाकला. तेथील छाप्यात काही खरेदीखत व रोकड आढळल्याची चर्चा होत आहे.