अहमदनगर बातम्या

अखेर जायकवाडीला पाणी सोडले ! शेतकरी चिंतेत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने जायकवाडी धरणासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले असून ते टप्या-टप्याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाला पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भंडारदरा – निळवंडे धरणातून ३.३१ टीएमसी पाणी द्यायचे आहे. शुक्रवारी रात्री शासनाचा आदेश आल्याने रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात आले.

शनिवारी रात्री हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. हे पाणी ६ ते ८ दिवस चालू राहणार आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात ९ हजार २१० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ८ हजार १५१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या भंडारदरा शाखेचे अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नागरिकांचा पाणी देण्यास विरोध असतानाही समन्यायी कायद्यामुळे अखेर पाणी सोडण्यात आले आहे. पाणी न देण्यासाठी लाभक्षेत्रातून न्यायालयातही सामाजिक कार्यकर्ते, साखर कारखान्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत.

जायकवाडीला पाणी सोडावे यासाठी मराठवाडा विभागात आंदोलने झाली आहेत, तसेच भंडारदरा धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जायकवाडीला नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतून पाणी सोडले गेले आहे.

पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवातच होत असून इतक्या लवकर धरणसाठा रिक्त झाला, तर अकोले तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

पाण्याचे फेरवाटप व्हावे, यासाठी सातत्याने अकोले तालुक्यातील शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत. पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने न झाल्यास पुढील कालावधीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Jayakwadi