Ahmednagar News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समिती मध्ये आर्थिक अपहार, कामात अनियमितता या सारख्या विविध गोष्टींचा ठपका ठेवत अखेर त्यांचे निलंबित करण्यात आले. डेबरे यांच्या वरील निलंबन कारवाई ने सहकारात खळबळ उडाली आहे.
९ मे रोजी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी ठराव करत सचिव दिलीप डेबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले. बाजार समितीचे सचिव डेबरे यांची वागणूक संचालक मंडळाच्या निर्णयाशी सुसंगत न राहता चुकीच्या पद्धतीने कामकाज करत संचालक मंडळात बे-बनाव करत,
कामात अनियमितता, कर्मचाऱ्यांवर दहशत तयार करणे या सारख्या तक्रारी तसेच बाजार समिती संचालकांनी मंजूर कामाबाबत दुर्लक्ष करत त्याचा पाठपुरावा न करणे, मागील वर्षभरात ते कामावर विना परवानगी वारंवार सुमारे चार महिने गैरहजर राहणे तसेच बाजार समिती मधील काही व्यवहार संशयास्पद झाल्याने
संचालक मंडळाने सचिव डेबरे यांना सुधारणा करण्यासाठी वारंवार वेळ देऊनसुद्धा कामात सुधारणा न झाल्याने बाजार समितीच्या नावलौकिकास बाधा निर्माण होऊन बाजार समितीची प्रतिमा खराब होत असल्याचे अश्या व्यक्तीला बाजार समितीच्या सचिव पदावर ठेवणे हिताचे नसल्याचा ठपका ठेवत सचिव दिलीप डेबरे यांच्या निलंबनाची मागणी केली.
९ मे रोजी झालेल्या मासिक सभेत सचिव दिलीप डेबरे यांच्या निलंबनाचा विषय अजेंड्यावर ठेवत उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व १८ संचालकांनी सचिवांच्या निलंबनाचा प्रस्ताव संमत केला. या प्रकरणी सभापती अतुल उर्फ प्रवीण लोखंडे यांनी सचिव दिलीप डेबरे यांच्या कारभाराबाबत पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली असून, याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
श्रीगोंदा बाजार समितीच्या हिताच्या कारभाराबाबत तालुक्यातील सर्वच नेत्यांनी एकत्र येत सचिव दिलीप देवरे यांच्या निलंबनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. — अतुल लोखंडे, सभापती बाजार समिती