अखेर सत्य समोर आले ; आयएस पूजा खेडकर यांची कागदपत्रे सापडली, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र तसेच या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक हि सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करणार आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक पार पडणार आहे.

पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. तर पूजा खेडकर ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झालेली आहे.

प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून तिची पुण्यात नियुक्ती करण्यात आलेली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणं, भारत सरकार असा बोर्ड लावणं, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन तिने केले होते, त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर तिची बदली करण्यात आली होती. तर तिचे प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा करण्यात आला होता, त्यानंतर तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिलेल्या प्रमाणपत्राबाबतची कागदपत्रे अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शोधण्यात येत होती. अखेर तशी प्रमाणपत्र दिल्याबाबतची कागदपत्रे सापडली आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. पूजा खेडकर संबधित सर्व कागदपत्रे आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर केली जाणार आहेत.

पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र २०२१ मध्ये दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे.शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe