अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रीय महामार्ग कल्याण रोड सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षणाचे काम सुरु झाले आहेत. लवकरच माती परीक्षणाचे काम पूर्ण होऊन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. या कामाला आता गती मिळाली आहे. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
कल्याण रोड सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षणाच्या कामास त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग कल्याण रोड हा नगर शहरातून जात आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून मोठी वाहतूकीची वर्दळ आहे सीना नदीवरील पूल हा अनेक वर्षाचा झाला असून, तो पूल धोकादायक बनला आहे.
या पुलाचे काम लवकरच मार्गी लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. याच बरोबर कल्याण रोडवरील बायपास ते नेप्ती नाका आयुर्वेद कॉर्नर ते सक्कर चौकाच्या रस्त्यापर्यंतच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरणाने बनवणार असून कॉंक्रीट साईट गटारचे काम ही सुरू होणार आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाची कामे होणेही गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
आज सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यानंतर पुलाच्या कामाचा आराखडा तयार करून पुलाच्या कामाला सुरुवात होईल.