Ahmednagar News : राहुरी शहर येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एका वाईन्स दुकानात २४ तासात दोनदा आग लागल्याची घटना (दि.२८) घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे.
सदर दुकानात (दि.२७) एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ती आग ताबडतोब विझविण्यात आली. त्यानंतर (दि.२८) एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पुन्हा त्याच दुकानात आग लागली.
यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दल पाठवून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गोडाऊनला आग लागल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे राजेंद्र पवार, नंदू मोरे, लखन काळे, अमोल गिरगुणे, बाळासाहेब पवार यांनी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
यावेळी पोलीस पथक व महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, त्या दुकानात चोरुन लाईट कनेक्शन घेतल्याचे दिसून आले. अशी परिसरात चर्चा सुरु होती.