Ahmednagar News : मराठा आरक्षणाची धग आता कोल्हार भगवतीपूर परीसरातही पोहोचली आहे. आधी आमरण उपोषण नंतर गांवबंद तर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक गावाच्या मुख्य चौकत झळकत आहेत.
राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतिपूर येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी प्रथम गावातील अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले. सोमवारी संपूर्ण गाव बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला.
त्यानंतर स्व. माधवराव खर्डे पाटील चौकात निषेध सभा घेऊन मराठा अनोलनाची धार तेज केली होती. आता तर थेट कोल्हार भगवतिपूरमध्ये सर्व राजकीय नेत्यांना गांवबंदीचे फ्लेक्स गावातील चौका चौकात लावले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने आता इथे चांगलाच जोर पकडला आहे.
फ्लेक्सवर मराठा आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष व नेत्यांना गावात प्रवेश नाही. आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. आजवर लढलो मातीसाठी, आता एक लढा जातीसाठी अशी वाक्ये यावर लिहिण्यात आली असून जो समाजाला मानत नाही, त्याला समाज मानत नाही!
समस्त सकल मराठा समाज कोल्हार भगवतिपूर असा मजकूर या फ्लेक्सवर छापला आहे. त्यामुळे आता हे आरक्षणाचे आंदोलन पुढे कुठे जाईल हे सांगणे कठीण बनत आहे.
इतर ठिकाणांप्रमाणे इथे मराठा आंदोलन चिघळून कुठलीही अप्रिय घटना घडली नसून येथील मराठा समाजाचे आंदोलन अद्याप शांततेच्या मार्गाने सुरू आहे; मात्र आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने सहपरिवार जरांगेच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात येत आहे, तर बुधवारपासून साखळी उपोषण सुरू होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची धग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे.