Ahmednagar News : अहमदनगर शहर झपाट्याने विकासाकडे वाटचाल करत आहे. नगर शहरात अलीकडलील काळात विविध विकासकामे केली जात आहेत. दरम्यान शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असल्याची माहीत आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. यातील एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डनमध्ये म्युझिकल फाउंटन बसवले आहे.
आता लवकरच दुसरा म्युझिकल उद्यान सावेडी परिसरातील गंगा उद्यान येथे निर्माण होईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. माजी उपमहापौर गणेश भोसले हे नवनवीन संकल्प मांडणारे नेतृत्व आहे. घरगुती गणपती विसर्जनासाठी त्यांनी शहरात पहिल्यांदाच हौदाची संकल्पना आणली.
नंतर संपूर्ण शहरात नागरिक एकत्र येत गणेश विसर्जनाचा उपक्रम साजरा करू लागले, असे जगताप महणाले, साईनगर येथे त्यांच्या व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
भोसले म्हणाले, राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराचा विकास खुंटला होता, पण आमदार जगताप विकासाचा ध्यास घेऊन काम करत राहिले. जी कामे पूर्वीच व्हायला पहिजे होती ती आज पूर्ण होत आहेत. आज इतर ठिकाणी स्थायिक झालेले नगरकर पुन्हा एकदा शहरात वास्तव्यात येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले.
इच्छाशक्ती अभावी शहराचा विकास खुंटला होता
गणेश भोसले यांनी यावेळी विरोधकांत टीकास्त्र देखील सोडले. ते म्हणाले, मागील ३०-३५ वर्षापासून राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराचा विकास खुंटला होता. परंतु नगरकरांनी शहर विकासाचा मुद्दा हाती घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्यावर विश्वास सोपवला. आमदार जगताप यांनी नगरकरांच्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता काम केले आहे असेही ते म्हणाले.
नगरची नवीन ओळख निर्माण झाली
यावेळी प्रकाश भागानगरे यांनी नगर शहराची नवीन ओळख निर्माण झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पूर्वी नगर शहराची ओळख खेडे अशी होती. परंतु आमदार जगताप यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या विकास कामांमुळे शहराची ओळख आज बदलतं शहर अशी झाली आहे असे ते म्हणाले.