अहमदनगर बातम्या

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात रंगणार पंचरंगी लढत! कसे ठरणार विजयाचे गणित?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. अर्ज माघारी नंतर या ठिकाणचे लढतीचे चित्र जवळपास निश्चित झाले असून या मतदारसंघातून आता पंधरा उमेदवार रिंगणात आहेत.

परंतु या 15 उमेदवारांपैकी खरी लढत ही पाच उमेदवारांमध्ये रंगेल हे मात्र निश्चित आहे. पाच उमेदवार जर आपण बघितले तर भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एडवोकेट प्रताप ढाकणे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले तसेच हर्षदा काकडे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण या पाच उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे.

विशेष म्हणजे आपण जर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय घराणे बघितले तर ते घुले, काकडे तसेच राजळे व ढाकणे हे आहेत व या चारही प्रमुख राजकीय घरातील व्यक्ती या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत.

कसे ठरणार विजयाचे गणित?
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 15 उमेदवार रिंगणात असून यापैकी भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एडवोकेट प्रतापराव ढाकणे तसेच अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे आणि चंद्रशेखर घुले व वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्यामध्ये खरी टक्कर होणार आहे.

जर आपण या ठिकाणाचे विजयाचे गणित जर बघितले तर साधारणपणे ते मतांच्या विभागणीवर अवलंबून असणार आहे. गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असून 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांचा पराभव केला होता.

तेव्हा मात्र घुले व काकडे यापैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगणात न होते. परंतु त्यांनी सगळी ताकद तेव्हा प्रतापराव ढाकणे यांच्या पाठीशी उभी केली होती. पण यावेळेस मात्र सर्व गणित बदलले असल्यामुळे यावेळेस काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

जेव्हा खासदार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेव्हा भाजप मधील अंतर्गत गटबाजीने डोके वर काढले व भाजपचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना तिकीट मिळू नये म्हणून जोरदार प्रयत्न केले. परंतु या सगळ्या विरोधात देखील मोनिका राजळे यांनी बाजी मारली व परत उमेदवारी मिळवण्यामध्ये त्या यशस्वी झाल्यात.

तसेच मागच्या वेळी पराभव झाल्यानंतर देखील ढाकणे यांनी हार न मानता मतदारांशी संपर्क हा सुरूच ठेवलेला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते निलेश लंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील विखेंचे मताधिक्य घटून लंकेच्या विजयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आपण चंद्रशेखर घुले यांच्या बद्दल बघितले तर गेल्या सहा महिन्यापासून अपक्ष म्हणूनच ते या निवडणुकीची तयारी करत होते. त्यांचा प्लस पॉइंट म्हणजे शेवगा तालुक्यातील सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात असल्याने या मतांच्या जोरावर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राजळे, घुले आणि ढाकणे यांच्या ताब्यात सर्व सत्तास्थाने
मोनिका राजळे, ढाकणे आणि चंद्रशेखर घुले हे अहिल्या नगर जिल्ह्यातील कारखानदार व प्रस्थापित असल्यामुळे आतापर्यंत सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत. परंतु मतदारसंघातील बरेच प्रश्न सोडवण्यामध्ये मात्र ते संधी देऊन देखील अपयशी ठरले असल्याचा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे करत आहेत.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांनी देखील इतर समाज घटकांना संघटित करण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या प्रयत्नामुळे हे पाचही उमेदवार एकमेकांना काटे की टक्कर देतील हे मात्र निश्चित.

Ajay Patil