Ahmednagar News : विषारी गवत खाल्यामुळे पाच दुबत्या गायी मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. दिघी (ता. श्रीरामपूर) शिवारात नुकतीच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एकच गवत व जास्त प्रमाणात खाण्यात गेल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथील तरुण शेतकरी अक्षय जनार्दन वाणी यांचा दूध उत्पदनाचा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या चारा टंचाई भीषण असल्याने त्यांनी परिसरातुन आणलेले गवत गायींना खाण्यासाठी टाकले असता (दि.४) डिसेंबर रोजी एक गाय मरण पावली.
तर मंगळवार (दि.५) ते गुरूवार (दि.७) तारखेच्या दरम्यान, आठ ते दहा लिटर रोज दूध देणाऱ्या चार, पाच महिन्याच्या गाभण गायी यात दगवल्या गेल्याने सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे येथील शेतकरी अक्षय वाणी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गायींना विषबाधा झाल्याचे समजताच खैरी निमगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील उपचारासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु रक्तात विषबाधेचे प्रमाण जास्त झाल्याने सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याचे डॉ. सानप यांनी सांगितले.
गायी दगवल्यामुळे रोजच्या तीस ते चाळीस लिटर दुधाचे नुकसान झाले असून, सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे माझे नुकसान झाल्याचे शेतकरी अक्षय वाणी यांनी सांगितले. शासनाने आम्हाला त्वरीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता, मयत गायीचे डॉ. भांड व आम्ही पोस्टमार्टेम केले असून, गायीचे रक्त, गवत, अवयव आदी पुणे येथील लॅब मध्ये पाठवले असून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार असून, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.