Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पाच चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची नुकतीच सुरुवात झाली. या पाचही केंद्रांचा प्रारंभ काल बुधवारी (दि. १३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला.
नगर जिल्ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा झाला होता. या मेळाव्यातच कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. पालकमंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हात पाच ठिकाणी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ झाला आहे.
यामध्ये शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इस्टिट्युट राहाता नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर कॉलेज, के.जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी या महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
काल बुधवारी (दि.१३) येथे झालेल्या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेचे संचालक ज्ञानदेव म्हस्के, गणेशचे माजी अध्यक्ष मुंकुदराव सदाफळ, सुरेशराव सदाफळ, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, डॉ. कल्हापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,
अतात्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, कॅम्प संचालक डॉ. महेश खड़ें, आय.टी.आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, सुनिल दंडवते, डॉ. संजय गुल्हाने, जिल्हा कौशल्य समन्वयक मच्छींद्र उकीडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कौशल्य विकास केंद्रातून विद्यार्थ्यांना आता मार्गदर्शना बरोबरच नोकरी मिळण्याच्या संधी, मुलाखती बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे येणाऱ्या काळात कौशल्य आधारीत शिक्षणातून मोठी रोजगार निर्मीती होणार आहे.
युवा शक्तीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत होऊन होण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक युवा धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊन याद्वारे युवकांना गरजेभिमुख कौशल्य प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडनवीस यांनी सांगितले.
पाच महाविद्यालयांमधून सुरु झालेले चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी असून, जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, मार्गदर्शन या केंद्रांमधून निश्चित उपलब्ध होईल.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही कौशल्य केंद्र खुप उपयुक्त ठरतील. – ना. राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री