अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पठारवाडी ग्रामपंचायतीवर आता महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे. केवळ राजकारणामुळे जिवलग मित्र एकमेकांपासून दूर गेले होते.
वीस वर्षांच्या कालखंडानंतर या मित्रांना एकत्र आणण्याचा करिष्मा आमदार नीलेश लंके यांनी केला. लोणीहवेली, जातेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार लंके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पठारवाडीत किसनराव सुपेकर हे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सरशी होत असे. कोणत्याही निवडणुकीत पठारवाडीत शिवसेनेलाच आघाडी हे जणू समीकरणच होते. याच राजकरणातून कधी काळी एकमेकांचे मित्र असलेले किसनराव रासकर व हरिभाऊ पवार हे एकमेकांचे विरोधक झाले.
यंदा आमदार लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींची घोषणा केली. त्यानिमित्ताने झालेल्या बैठकीत सुपेकर व पवार यांचे मनोमिलन घडवून आणण्याचा करिष्मा लंके यांनी करून दाखवला. एकमेकांना पेढे भरवून सुपेकर व पवार यांनी कटूता दूर केली.
आता बिनविरोध पठारवाडी ग्रामपंचयतीवर एकट्या शिवसेनेचा नव्हे, तर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे. राळेगणसिद्धी, कारेगाव, पानोली, हिवरेकोरडा, सारोळा आडवाई, शिरापूर, पठारवाडी, माळकूपसह लोणीहवेली व जातेगाव या १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. आणखी २५ ते ३० ग्रापंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.