अहमदनगर बातम्या

Shirdi Airport Flights: शिर्डी विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढणार ! हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी पसंती

Published by
Ahmednagarlive24 Office

Shirdi Airport Flights : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करून आता १० महिने झाले तरी, परंतु वेळापत्रक आले नसल्याने तुर्तास धावपट्टीची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे;

मात्र आता हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरूसाठी प्रत्येकी एक अशा अधिकच्या तीन विमानांच्या फेऱ्या एप्रिल महिन्यात वाढणार असून दिवसा ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या १८ वरून २४ वर पोहोचणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, की राज्यातील श्री साईबाबा शिर्डी विमानतळावर सहा वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नाईट लॅण्डींगची सुविधा शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

त्याच दिवशी रात्री नऊ वाजता पहिले विमान प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे झेपावले; मात्र त्यानंतर या विमानतळावरून एकही विमानाने रात्री उड्डाण अथवा लॅडींग केले नाही.

या घटनेला एप्रिल २०२४ मध्ये बरोबर एक वर्ष पूर्ण होणार आहे. याबाबत शिर्डी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला असून सध्या धावपट्टीची पुनर्रचना करण्याचे काम सुरू असल्याचे कारण पुढे केले आहे. असे असले तरी देखील दिवसा उड्डाण आणि लॅडींग करणाऱ्या विमानांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे रोज सध्या ९ येणारी व ९ जाणारी अशी १८ विमाने येथे येत आहेत. आता यामध्ये अधिक तीन विमानांचा समावेश होणार असल्याने ही संख्या १२ होईल. १८ ऐवजी एकूण २४ विमाने ये-जा करणार आहेत. भौगोलिकदृष्ट्या शिर्डी विमानतळ उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक आणि देशभरातील महानगरात कामानिमीत्त ये-जा करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे.

नाईट लँडींग सुविधेअभावी त्याच्या विस्ताराला खीळ बसली होती. अखेर परवानगी मिळाल्यानंतर दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाइन्सच्या पहिल्याच विमानाची ट्रायल झाली आणि या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले.

देशाच्या विविध महानगरांतून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. अधिकच्या विमान फेऱ्या वाढणार असल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. सध्या दोन विमान कंपन्यांची एकूण नऊ विमाने येथून ये-जा करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ही संख्या तेरापर्यंत वाढली होती. यामध्ये आणखी दोन नामांकीत कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. धावपट्टी पुनर्रचनेनंतर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यास विवीध महानगरातून येथे विमाने ये-जा करू लागतील. रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office