अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील अशोका हॉटेल झेंडीगेट ते सक्कर चौक दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाचे काम चालु असून अशोका हॉटेल चौक ते स्टेट बँक चौकात पिलर स्टील फिटींगचे काम झाले असून काँक्रीट भरण्यास सुरवात होणार आहे.
या कामामुळे येथील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आला असला तरी, वाहतूक कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भिंगारकडे जाणारी वाहतूक अशोका हॉटेल चौक झेंडीगेट मार्गे वळविण्यात आल्याने औरंगाबादहन पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि जीपीओची वाहतूक बंद केल्यामुळे तेथून येणारी वाहने यांची कोंडी होत आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि या ठिकाणी वाहने जाणे येण्यासाठी सध्या कोणतेही नियोजन नसल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम होत असून किरकोळ किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यामुळे अशोका हॉटेल चौक झेंडीगेट येथे वाहतुकीच्या व्यवस्थेकरिता वाहतुक पोलीस आणि उड्डाणपुल कंपनीने यासाठी योग्य पावले उचलावीत.
पोलीस प्रशासनाने या वाहतुक कोंडीसाठी योग्य ते निर्णय घेऊन शक्य असल्यास वाहतुक पोलीसांमार्फत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत येथील वाहतुकीचे नियमन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.