मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माझ्या रुपाने राहुरी मतदारसंघाला मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग करून कोरोना काळातून सरकार सावरताच मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे.

येत्या वर्षात मतदारसंघात होणारी विविध विकासकामे हेच विरोधकांच्या टीकेला उत्तर असल्याचे राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत ना. तनपुरे म्हणाले, तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी साथ दिल्याने त्यांच्यासाठी तसेच, राहुरी शहर स्मार्ट करण्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी ना. तनपुरे यांनी महत्वाची कामे मार्गी लावली आहेत.

शहराची २०४० सालची लोकसंख्या गृहीत धरून सुधारित पाणीयोजनेचा शब्द पूर्ण करून त्या कामाची २० कोटी रुपयांची ऑनलाईन निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

विधानसभेत राहुरीकरांचा पाण्याचा प्रश्­न मांडत अखेर त्यासाठी २० कोटी रूपये मंजूर करून घेतले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे निधीची अडचण असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास बाब म्हणून राहुरीकरांसाठी २० कोटी रूपयांच्या योजनेला मंजूरी दिली. आता निविदाही प्रसिद्ध झाली आहे.

जांभळी येथे नविन सबस्टेशन मंजूर केल्याने तेथील वीजेचा प्रश्­नही संपूष्टात येणार आहे. राहुरी तालुक्यातील कानडगाव, जांभळी, खडांबे येथे नवीन वीजनिर्मिती उपकेंद्राला मंजूरी मिळाली आहे.

यासह बाभूळगाव, आरडगाव, राहुरी खुर्द, ताहाराबाद येथील व नगर तालुक्यातील जेऊर येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे राहुरी मतदारसंघातील वीजेचा प्रश्­न सोडविण्यास मोलाची मदत होणार असल्याची माहिती ना. तनपुरे यांनी दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24