अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकर्यांना रात्री शेतात जाणे टाळले जावे, यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्य शासनाने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ७३ कोटी ५० लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
उर्वरित निधी लवकरच प्राप्त होऊन वितरित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कोरोना काळात सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचार्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश आणि कृतज्ञतापत्र प्रदान केले. राज्य शासनाच्या वर्षपूर्तीच्या काळात ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण महाराष्ट्रासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी स्व. आर.आर. पाटील सुंदर गाव योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यासाठी गावांना देण्यात येणार्या बक्षिसांच्या रकमेत दुप्पट वाढ केल्याची माहिती त्यांनी दिली. आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यावरील उपाययोजना, कृषी योजना आदींचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला.
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि.प. सदस्य सुनील गडाख, संदेश कार्ले, शरद नवले, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून पाथर्डी तालुक्यात त्याने तीन जणांचे बळी घेतले. वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यासाठी अधिक पिंजरे मिळावेत, यासाठी राज्य स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करु. नागरिकांनीही बाहेर पडताना, शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्यांना रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतीसाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
त्यासंदर्भात श्री. मुश्रीफ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात दिवाळीपूर्वी पाहणी करुन पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, याकामी जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि सहकार्यांनी नियोजन करुन चार दिवसांतच पंचनामे पू्र्ण केले. त्यानंतर तात्काळ राज्य शासनाने दिवाळीपूर्वीच पॅकेज जाहीर केले.
जिल्ह्यासाठी एकूण १२८ कोटी रुपयांची मागणी असून पहिला ७३ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्याचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे निष्काळजीपणा वाढणार नाही आणि प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. आता थंडीचे प्रमाण वाढत आहे.
त्यामुळे सर्व जिल्हावासियांनी स्वताची आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनावर लस लवकरच येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने लसीकरण मोहिम कशापद्धतीने राबवावी, यासाठी आरोग्य कर्मचारी यांचा डाटाबेस तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. कोरोना काळात सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या ग्रामविकास विभागातील कर्मचार्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच जाहीर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील बाळासाहेब वैराळ आणि प्रशांत अहिरे या कर्मचार्यांना कोरोना कालावधीत त्यांचा जीव गमवावा लागला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या दोघांच्या वारसांना विमा कवचाचा धनादेश आणि कृतज्ञतापत्र प्रदान केले. उर्वरित कर्मचार्यांचे प्रस्तावही लवकरच मंजूर होतील, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली. मनरेगामधून १ लाख पाणंद रस्ते तयार करण्याचा कार्यक्रम तयार केला. कुशल अकुशल मजुरांसाठी अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जनावरांचा गोठा, शेळीपालनासाठी शेड आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
कोविड मुळे सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्यांना ५० लाख विमा कवच, महिला बचत गटांच्या मालाला बाजारपेठ, गावे सुंदर व स्वच्छ बनवण्यासाठी स्व. आर.आर. पाटील सुंदर गाव योजना, १५ व्या वित्त आयोगा्च्या निधीचे वाटप, मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा विलगीकरणासाठी निर्णय, ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मोजणीचा निर्णय असे विविध निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved