महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या पेंडशेत या गावातील काशिनाथ खोले व त्यांच्या पत्नी सुमन खोले यांचे कुटुंब हे शेतीमध्ये सगुना भातशेती या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.
हे कुटुंब कमी खर्च व कमी मेहनत करत तीनपट भाताचे उत्पन्न घेत असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही शेतकरी खोले यांच्या शेतीला भेट देत आहेत.
अकोले तालुक्यातील पेंडशेत हे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या गावातील भातशेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.
खोले कुटुंबाने पारंपरिक भातशेतीला फाटा देत सगुना भात तंत्राचा वापर करण्याचा प्रयोग केला. सगुना भात शेतीला त्यांनी सेंद्रिय शेतीची जोड दिली. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कारप्राप्त व एस.आर.टी. जनक चंद्रशेखर भडसावळे यांच्याकडून ही पद्धती जाणून घेऊन त्याचा यशस्वी प्रयोग ते गेल्या १२ वर्षांपासून करून कमी खर्च व कमी मेहनतीत तीन पट जास्त उत्पन्न काढत आहेत.
नांगरणी न करता, कोरडीतच धुळवाफेत टोकण यंत्राने बियांची टोभणी करायची त्यामुळे चिखलणी करणे, रोप टाकणी व लावणी ही कामे टळतात. परिणामी कष्टाची कामे व खर्च खूप वाचतो. तन नियंत्रण तननाशक वापरून करायचे. या पद्धतीने तीन पट जास्त उत्पन्न मिळते, हा त्यांचा १२ वर्षांचा अनुभव.
यास त्यांनी सेंद्रिय शेतीची जोड दिली आहे. रासायनिक खते व औषधे न वापरता सेंद्रिय खते औषधे वापरतात. गांडूळ खत, शेणखत, गोमूत्र, स्लरी, जीवामृत, निमतेल, करंजतेल याचा वापर करून पूर्ण सेंद्रिय उत्पादन घेतात. त्याच्याकडे, जिरवेल, काळभात, कोळपी, इंद्रायणी, ज्ञानेश्वरी, भोगावती अशा ९ वाणांचे भात आहे.
काशिनाथ खोले यांची शेती पहाण्यासाठी सतत शेतकरी व अधिकारी येत असतात. यापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील व्हॉटर शेड ऑर्ग. नामझेहान ट्रस्टचे २६ शेतकरी पेंडशेतला पावसाळ्यापुर्वी आले होते. त्यांना काशिनाथ खोले यांनी सर्व प्रशिक्षण दिले.
त्या नुसार त्यांनी आपल्या गावी भात पिक घेतले. पुन्हा खोले यांचे भात पिक पाहाण्यासाठी ४० शेतकऱ्यांचे पथक पाहाणी करून गेले. तसेच तालुक्यातील बारी, वारंघुशी, शेंडी, आंबेवंगण, वाकी, शिळवंडी, शेणीत, खिरविरे, चिचोंडी, तिरडा पाचपट्टा, मान्हेरे या परिसरातील अनेक शेतकरी भात शेती पाहण्यासाठी येत आहेत