दिव्यांग प्रमाणपत्रांची बनावटगिरी; मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- येथील कोतवाली पोलीस ठाण्यात नुकताच दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या चौघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अशा प्रकारचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना दिले आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून एसटी बसच्या प्रवास भाड्यासाठी लागणारे ओळखपत्र काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक यावर जिल्हा परिषदेने तात्काळ गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.

सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडे न्यायाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना संबधित बनावटगिरी करण्यार्‍या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले.

या गुन्ह्यातील आरोपी विक्रम विष्णुकांत राठी, विश्‍वनाथ ग्यानदेव फाळके, महेश दशरथ मते, सुनिल खंडु पवार यांच्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आलेले आहे…

2013 मध्येही झाली होती बनावटगिरी अशाच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र अनेक लोकांकडे असण्याची व यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याची शंका संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

अशाच प्रकारचा गुन्हा जिल्हा परिषदेत सन 2013 मध्ये घडला होता. त्यामध्ये अनेक बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारक शिक्षकांचा समावेश होता. त्यात मोठे रॅकेट सापडले होते.

सदर दाखल गुन्ह्यामध्येही मोठे दलालांचे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या प्रमुख दलालांचा शोध घेण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.