अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- घटनेने दिलेल्या ओबीसीचा हक्क टिकवायचा असेल तर जात विसरुन प्रथम ओबीसी म्हणून एकत्र यावे लागेल. जात हा विषयच नको, तरच तुम्ही राज्यकर्ते व्हाल.
पद आज आहे, उद्याचे कोणाला माहित. मात्र मला मिळालेल्या पदाचा उपयोग ओबीसींना न्याय देण्यासाठी केला तर जनतेच्या मनात मी कायम राहील, असे प्रतिपादन बहुजन विकास मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ओबीसी व्ही.जे.एन.टी मोर्चाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना ना. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसीसाठी छगन भुजबळ यांचा पुढाकार मोठा आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींसाठी जे केलं तोच वारसा मी स्वीकारला आहे.
ओबीसींची जनगणना करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र केंद्राने ही मागणी स्विकारली नाही तर राज्य स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींसाठी चांगले निर्णय घेतले आहेत.
ओबीसींची जनगणना झाली तर ज्याची संख्या भारी त्याचा हिस्सा भारी असे समीकरण निर्माण होईल. देशांमध्ये 60 टक्क्याच्यावर ओबीसी दिसेल. हा 60 टक्के ओबीसी समाज गेली सत्तर वर्षे उपेक्षित आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या तो मागासलेला आहे.
अलीकडे मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे 19 टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला, पण कुणबीच्या खोट्या दाखल्यामुळे ते हिरावलं गेले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तो पर्यंत एम.पी.एस.सी.च्या निवडींना काही उपद्रवी लोकांनी आडकाठी आणली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांचा ओबीसीत समावेश नको, ही आपली भूमिका आहे. मात्र त्यालाही उपद्रवी लोक आमचं होत नाही, मग तुमचं कशाला, असे म्हणत आडकाठी आणत आहेत.
एम.पी.एस.सीच्या संदर्भात 25 तारखेनंतर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कोणी नेतृत्वासाठी, कोणी जातीसाठी असं राजकारण होता कामा नये 382 जाती या उपेक्षित आहेत, त्या सर्व जातीच्या शक्तींची गरज असून तलवारीची गरज नाही.
छत्रपती शाहू महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे राहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बाराबलुतेदारातुनच निर्माण झाले म्हणून आम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे, मात्र आधी आमचं मिळावं असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे असा टोला वडेट्टीवार यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे नाव न घेता लगावला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप यांनी भूषवले, लक्ष्मण हाके, बालाजी शिंदे, बी.डी चव्हाण, सौ.साधना राठोड, कल्याण दळे, सोमनाथ काशीद, अशोक सोनवणे, अंबादास पंधाडे, अंबादास गारुडकर, इंजि.बाळासाहेब भुजबळ, अरुण खरमाटे आदिंची यावेळी भाषणे झाली.
स्वागत आनंद लहामगे यांनी केले तर प्रास्तविक भगवान फुलसौंदर यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी राजेंद्र पडोळे, बाळासाहेब भुजबळ, चंद्रकांत फुलारी, बाबासाहेब सानप, अशोक दहिफळे, अमोल भांबरकर, शशिकांत पवार, रमेश बिडवे, किरण बोरुडे, बाळासाहेब बोराटे, हरिभाऊ डोळसे, विशाल वालकर, दत्ता जाधव, अनिल निकम, श्रीकांत मांढरे, करण ढापसे, संजय आव्हाड, संजय सैंदर, अनिल इवळे आदी प्रयत्नशील होते.
यावेळी नगरसेविका पल्लवी जाधव, मंगल भुजबळ, अभय आगरकर, अरुण मुंडे, सुनील त्रिंबके, अनिल बोरुडे, बाबुशेठ टायरवाले, शरद झोडगे, विक्रम राठोड, नईम शेख, फिरोज शफी खान, गर्जे, माऊली गायकवाड, निशांत दातीर, सागर बोडखे, सागर फुलसैंदर, सौ.फुलारी, वनिता बिडवे, स्वाती पवळे, मनीषा गुरव आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या शेवटी विविध संघटनांच्या वतीने मंत्री महोदयांना निवेदने देण्यात आली. सूत्रसंचालन अमोल बागुल आणि राजेश सटाणकर यांनी केले. रमेश सानप यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप झाला.