नीलेश लंकेंच्या सुप्यात अतिक्रमणांवर बुलडोजर, विखेंनी वचपा काढला? मंदिरही पाडल्याने भाजपच्या हिंदुत्ववादावर नेटकऱ्यांचे प्रश्नचिन्ह

Ahmednagarlive24 office
Published:
lanke atikranman

Ahmednagar Politics : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले होते. परंतू स्वत: हून अतिक्रमणे काढली जात नव्हते. मध्यंतरी लोकसभा निवडणूक लागल्याने ही मोहीम थंडावली होती. मात्र शनिवारी सकाळी सात वाजता पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सदर अतिक्रमण काढण्यात येणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

विखेंनीच केली कारवाई?
दरम्यान ही कारवाई सुरु असली तरी दुसरीकडे मात्र आता याला राजकीय रंग येऊ लागला आहे. या कारवाईला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी जोडली जात असून नीलेश लंके यांच्या समर्थकांनी  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आगपाखड करण्यास सुरवात केली आहे.

विखे पाटील यांनीच आकसातून ही कारवाई करण्यास भाग पाडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. परंतु स्वत: लंके किंवा विखे पाटील यांनी मात्र यावर भाष्य केलेले नाही. यावरून सोशल मीडियामध्ये राजकीय संदर्भ जोडून चर्चा सुरू झाल्याने राजकीय रंग चढायला सुरवात झाली आहे.

पारनेर तालुक्यातील लंके समर्थकांनी यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांना जबाबदार धरले असून निवडणुकीच्या रागातून विखे यांनीच ही कारवाई करायला भाग पाडले असल्याचे जोरदार टीकास्त्र लंके समर्थकांनी सोडले आहेत.

मंदिर पाडल्याने, हाच का भाजपचा हिंदुत्ववाद? अशा सवालांची सरबत्ती
दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक मंदिर जेसीबीद्वारे पाडले जात असल्याचे दिसत आहे. हाच भाजपचा हिंदुत्वादी चेहरा आहे का असा सवालही या व्हिडिओच्या खाली काही नागरिकांनी केला आहे.

मोठा फौजफाटा
या फौज फाट्यात २ डिवायएसपी, ७ पोलिस निरीक्षक, तात्काळ दंगल नियंत्रण पथक (क्यू आर टी), एसआरपी पथक, १०० पोलीस कर्मचारी, ५ जेसीबी , जाळीच्या गाड्या असा फौज फाटा बस स्थानक चौकात दाखल झाल्याने अतिक्रमण धारकांची एकच तारांबळ उडाली. प्रथम सुपा बसस्थानक चौक ते औद्योगिक वसाहत चौकापर्यंत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली.

यात रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळ समोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापुर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीन दोस्त करण्यात आले.

तर औद्योगिक चौक ते नगर – पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली. अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेल्या टपर्या जमीनीच्या लेवलला नेल्या जात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.