अहमदनगर बातम्या

धक्कादायक ! काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष यांचा आढळला मृतदेह; 30 वर्षापासून होते राजकारणात सक्रिय

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली असून काँग्रेस पक्षाचे माजी पाथर्डी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांचा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेमध्ये शनिवारी सकाळी शेवगाव रस्त्याच्या बाजूला खेर्डा फाटा येथील एका शेतामध्ये आढळून आल्याने एकच खडबळ उडाली आहे.

ते गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होते व त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी 25 नोव्हेंबरला पाथर्डी पोलिसांमध्ये दिलेली होती. हे सगळ्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता व अखेर शनिवारी त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथे आढळून आल्याने परिसरात आणि तालुक्यात खडबड उडाली व अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांचा आढळला मृतदेह
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेस पक्षाचे माजी पाथर्डी तालुका अध्यक्ष मिठूभाई शेख हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते व त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी 25 नोव्हेंबरला पाथर्डी पोलिसांमध्ये दिलेली होती.

अखेर त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथे शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी आढळून आला व ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अभयसिंग लबडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राम सोनवणे इत्यादी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी शेख यांच्या कुटुंबियांना बोलावून घेत त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली.

सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून पोलिसांनी शेवगाव रोडच्या काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले असता त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून व पायातील चपलावरून पडलेला मृतदेह त्यांचाच असल्याची खात्री पटली आहे.

कशी होती मिठूभाई शेख यांची राजकीय कारकीर्द?
मिठूभाई शेख हे गेल्या 30 वर्षापासून पाथर्डी तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. जर त्यांच्या राजकारणाची सुरुवात पहिली तर माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली. ढाकणे यांनी सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात देखील ते सक्रिय होते.

या आंदोलनाच्या कालावधीमध्ये मिठूभाई यांना अटक देखील झाली होती व काही दिवस ते विसापूरच्या तुरुंगात राहिले होते. कोणतीही निवडणूक असो किंवा कुठल्याही पक्षाची सभा असो तरी त्यामध्ये ते त्यांची छाप पाडून जात होते. नंतरच्या कालावधीत त्यांनी माजी आमदार आप्पासाहेब राजळे,

दिवंगत राजीव राजळे यांच्या नेतृत्वाखाली देखील काम केले. एवढेच नाही तर तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख, यशवंतराव गडाख, दिवंगत भाऊसाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील त्यांचे जवळचे व घनिष्ठ असे संबंध होते.

मिठूभाईंनी पाथर्डी ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच पद देखील भूषवले होते. पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अशाप्रकारे काँग्रेसचे दीर्घ कालावधीपासून ते कार्यकर्ते व नेते होते व त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग देखील होता.

डीएनए तपासणीसाठी अवशेष पाठवले
सायंकाळी शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांचे काही अवशेष डीएनए तपासणीसाठी नाशिकला पाठवल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामधील सत्य पोलीस तपासातून समोर येईल.

Ajay Patil