अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा समजला जातो. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नुकतेच भाजपच्या वतीने याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
भाजपने आता पुन्हा अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले,
मी अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनासमोर मांडला होता मात्र तो होऊ शकला नाही. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे.
क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अहमदनगर हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवायलाही अडचणीचे होते.
ते कोविड-19 महामारीतही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नाही.
याला कारण जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयाकडून जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविल्याचे कळते. मात्र माझ्या मते अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाचा नगर विकास विभागाशी संबंध येत नाही.