अहमदनगर बातम्या

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदेंचा मुंबईत ना. थोरात, आ.पटोलेंच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश ; काळेंची मोठी राजकीय खेळी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. मुंबईत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले

यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे राष्ट्रवादीचे मनपाचे माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांच्यासह किरण शिंदे, संतोष धनगर, विजय शिंदे, अंकुश धनगर, चंदर शिंदे, गोरख धनगर आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.मोहन जोशी, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड, भटके-विमुक्त विभागाची प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, प्रदेश सचिव देवानंद पवार,

प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, काँग्रेस क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

मागील आठवड्यात भाजप, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी या पक्षांतून काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यानंतर आता शिंदे यांच्यासारखा सावेडी उपनगरातील मोठा राजकीय मासा काँग्रेसने गळाला लावल्यामुळे काळे यांचे शहरातील राजकीय वजन वाढले आहे.

बाळासाहेब भुजबळ यांची प्रदेशाध्यक्षांनी पक्षातून हाकलपट्टी केल्या नंतर पक्षात सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे ना.थोरात, आ.पटोले मात्र काळे यांच्या कामगिरीवर खूष आहेत. दशरथ शिंदे हे राष्ट्रवादीकडून दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. मनपाचे विरोधी पक्षनेते पद देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूषविले आहे.

राष्ट्रवादीच्या भटके-विमुक्त आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष होते. आ. जगताप पिता-पुत्रांच्या नेतृत्वाला वैतागून त्यांनी दिवंगत शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. स्व. राठोड यांच्या निधनानंतर ते शिवसेनेपासून काहीसे अलिप्त असल्याचे जाणवत होते.

दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सावेडीमध्ये काँग्रेसला शिंदे यांच्या रूपाने मजबूत नेतृत्व मिळाले आहे. ना. थोरात या वेळी बोलताना म्हणाले की, किरण काळे हे अत्यंत संघर्षातून नगर शहरामध्ये काम करीत आहेत.

त्यांच्यावर त्यामुळे अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांनी नगरकरांच्या अपेक्षा त्यांच्या कामातून वाढविल्या आहेत. मी, नानाभाऊ आणि संपूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे. प्रदेशाध्यक्ष आ. पटोले म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे.

हाच ट्रेंड कायम राहणार असून नगर शहरात किरण काळेंच्या नेतृत्वाखाली तयारी करत कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. दशरथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काँग्रेस पक्षामध्ये उज्वल भवितव्य आहे. पक्ष प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दशरथ शिंदे म्हणाले की,

शरद पवारांच्या नेतृत्वामुळे मी राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष काम केले. स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्या माध्यमातून मी जनसेवा करत होतो. अनिलभैय्या यांच्यानंतर अनेक सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे.

या परिस्थितीत किरण काळे यांच्या अभ्यासू व निर्भीड तरुण नेतृत्वामुळे नगर शहरातील विविध पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या आशेने व विश्वासाने काळे यांच्याकडे पाहत आहेत. अनिलभैय्यांच्या नंतर किरण काळेंचा निर्भिड बाणा व विकासाचे व्हिजन मला भावले.

म्हणूनच मी काँग्रेसवासी झालो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की काळे यांच्या नेतृत्वात आगामी काळात नगर शहरात काँग्रेसचा महापौर होईल. अनेक मातब्बर चेहरे काँग्रेसच्या संपर्कात – काळे : शहरातील अनेक मातब्बर नेते, विविध पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी,

कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत असा दावा किरण काळे यांनी केला आहे. कोणते पत्ते कधी ओपन करायचे याचे राजकीय टाइमिंग मी योग्य वेळ आल्यानंतर साधण्याचे काम करेल. शहराच्या मानगुटीवर बसलेल्या अपप्रवृत्तींचा जनसामान्यांच्या पाठिंब्याने कसा राजकीय काटा काढायचा यासाठी मी ना. बाळासाहेब थोरातांच्या तालमीतील तेल लावलेला पैलवान आहे.

त्यामुळे कोणाला कधी पक्षात घ्यायचं ते त्या-त्या वेळी निश्चितपणे काँग्रेस करेल. काँग्रेस हाच नगर शहरामध्ये सक्षम विरोधी पक्ष असून जनतेच्या मनातील सक्षम पर्याय आहे, याचा पुनरुच्चार पूर्ण काळे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

Ahmednagarlive24 Office