अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-जेसीबीद्वारे मागासवर्गीय कुटुंबीयाचे घर पाडण्याचा प्रयत्न करुन, जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या श्रीगोंदा येथील माजी नगराध्यक्ष नंदकुमार उर्फ लक्ष्मण बोरुडे, त्याचा मुलागा गणेश बोरुडे व इतर चार ते पाच जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.
सदर आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन फिर्यादी भागचंद घोडके (रा. सिध्दार्थनगर, ता. श्रीगोंदा) यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात नुकतेच निवेदन दिले होते. तर कारवाई होत नसल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
भागचंद घोडके श्रीगोंदा तालुक्यात सिध्दार्थनगर येथे मागील पन्नास वर्षापासून पत्नी, मुले, सुना व नातवंडासोबत राहत आहे. 11 जानेवारीला नंदकुमार उर्फ लक्ष्मण बोरुडे, त्याचा मुलागा गणेश बोरुडे व इतर चार ते पाच जणांनी जेसीबी मशीन घेऊन येऊन घर पाडण्याचा प्रयत्न केला. सदर जागेबाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा सुरु असून,
तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील याबाबत रिट पिटीशन दाखल करण्यात आलेली आहे. दोन्ही दाव्याचा निकाल न्यायप्रविष्ट असून, सदर आरोपी बेकायदेशीरपणे घर पाडण्याचा प्रयत्न करीत होते. सदर आरोपी घर पाडण्यासाठी आले असता त्यांना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बेकायदेशीर कृत्य न करण्याचे सांगितले असता,
त्यांनी घोडके व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तर जेसीबी चालकाने लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला.
मागासार्गीय कुटुंबीय असल्याचे सदर आरोपी दमबाजी करुन केंव्हाही जेसीबी मशीन घेऊन येऊन घर पाडण्याचा प्रयत्न करुन राहत्या जागेतून परावृत्त करीत असल्याचे घोडके यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. सदर आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने घोडके यांनी आपला उपोषणाचा इशारा मागे घेतला आहे.