मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राहुरी मतदारसंघातील सर्व पात्र लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री कर्डिले यांनी राहुरी मतदार संघातील सर्व लाभार्थी महिलांना मोफत अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करून दिले आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व ना. पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली.
त्यानुसार १५०० रुपये प्रति महिना अनुदान दिले जाणार आहे. सदर योजना लक्षवेधी योजना असून मतदार संघातील सर्व पात्र महिलांनी उपलब्ध करून दिलेले अर्ज भरून संबंधितांकडे जमा करावेत.
या योजनेत चारचाकी वाहनाची व इतर लाभाची घेत असलेली अट मागे घेण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे सांगून सदर योजना यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांना अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करून द्यावे.
तसेच सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हा बँकेमध्ये उघडणार झिरो बॅलन्स खाते
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महिला भगीनीकडून शासनाने (दि.१) जुलै २०२४ पासून फॉर्म भरण्यास सुरुवात केली असून, यामध्ये बँकेचे खाते असणे आवश्यक असल्याने बँक खाते अभावी महिलांचे नुकसान होवू नये व खाते उघडताना आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने झिरो बॅलन्स वर महिलांचे खाते उघडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.