अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शिर्डी मतदार संघात सातत्याने सुरु असलेल्या विकास प्रक्रीयेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी चांगले पाठबळ दिले. सर्वसामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून अव्याहतपणे सुरु असलेल्या विकास कामांवर मतदारांनी या निकालातून शिक्कामोर्तब केले असल्याची प्रतिक्रीया भाजपाचे जेष्ठानेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील समाविष्ठ असलेल्या गावांपैकी ८ ग्रामपंचायतींसह राहाता तालुक्यातील २५ पैकी २४ ग्रामपंचायतींवर भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करीत बाभळेश्वर येथील ग्रामपंचायतीमध्ये १४ जागा तर हनुमंतगाव ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाने ११ जागा मिळवून विजश्री खेचून आणली आहे.
संगमनेर तालुक्यातील कनोली आणि मनोली या गावांमध्येही थोरात गटाचा पराभव करुन विखे पाटील गटाने आपले वर्चस्व सिध्द केले. त्याच प्रमाणे प्रवरा परिसरातील महत्वपुर्ण असलेल्या सात्रळ ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून विखे पाटील गटाने पटकावली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब, कुरणपूर, मांडवे, रामपूर येथेही विखे पाटील गटाला मोठे यश मिळाले आहे.
या विजयाबाद्दल आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डी विधासभा मतदार संघातील प्रत्येक गावात लोकांच्या सहभागातून विकासाची प्रक्रीया सातत्याने सुरु आहे. यामध्ये गावपातळीवर काम करणा-या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या माध्यमातून या विकास प्रक्रीयेला अधिक बळकटी दिली आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदार संघ हा राज्यात वरच्या स्थानावर आहे.
गावातील रस्ते, आरोग्य, पाणी या पायाभूत सुविधांबरोबरच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या होत असलेल्या यशस्वी प्रयत्नांना मतदारांनी या निवडणूकीच्या निमित्ताने दिलेले पाठबळ महत्वपुर्ण आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना कोणताही भेदभाव न करता गरजू आणि पात्र व्यक्तिंना लाभ मिळवून देतानाच, विधानसभा मतदार संघात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबिंयासाठी जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनेचे काम,
मोफत अपघात विमा योजनेचा असंख्य कुटुंबियांना मिळवून दिलेला लाभ हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे. सातत्याने सामाजिक बांधिलकीने सुरु असलेल्या या विकास प्रक्रीयेला ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून मतदारांनी एकप्रकारे दाद दिली आहे. भविष्यातही हीच विकासाची कामे अधिक आत्मविश्वासाने पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.