माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जनतेने त्यांची जागा दाखवली.

तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींवर आघाडीचा झेंडा फडकला, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ५६ पैकी ३३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. देवगाव, रतडगावसारख्या चार-पाच ग्रामपंचायतींमध्ये एका जागेवरून सत्ता गेली.

५८४ पैकी ३३७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. कर्डिले समर्थकांकडून तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर दावा केला जात आहे, याबाबत विचारले असता कर्डिलेंनी कोणत्या ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या ते जाहीर करावे, असे आव्हान गाडे यांनी दिले. पूर्वी जेऊर जिल्हा परिषद गटात इमामपूर ही एकमेव ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होती.

आता इमामपूर, जेऊर, धनगरवाडी, डोंगरगण या ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. इतर गावांत आमचे अनेक सदस्य निवडून आले आहेत. जेऊर गटात महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कर्डिले यांच्या गावात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ३० टक्के मते मिळाली, असा दावा गाडे यांनी केला.

भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच होईल. होऊ घातलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीतही तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे गाडे यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24