Ahmednagar News : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना प्रताप ढाकणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांच्यावर यशस्वी सांधेबदल शश्रक्रिया करण्यात आली होती.
मात्र, साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
मध्यंतरी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसेच भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनीसुद्धा रुग्णालयात येऊन ढाकणे यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
सध्या त्यांचे वय ८७ असून, संसर्गजन्य आजाराचा धोका नको म्हणून त्यांना कोणीही भेटू नये, अशी सूचना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली आहे.
आपले वडीलच रुग्णालयात उपचार घेत असल्याने सध्या आपण सुरु केलेली जनसंवाद यात्रा तूर्त स्थगित केली असून, या आजारातून ते लवकरच बाहेर पडतील, अशी अपेक्षा ढाकणे यांनी व्यक्त केली आहे.