अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत एकूण २ हजार ६०६ उमेदवारांपैकी तब्बल ९३२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
त्यामुळे ९४ ग्रामपंचायतींच्या १९२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यातील चार ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा रोवला असून आता उर्वरीत 287 प्रभागातील ६९६ जागांसाठी १ हजार ४८२ उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उभे आहे.
ग्रामपातळीवरील विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायत निवडणूकांना अलिकडच्या काळात अनन्यमहत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होताच निवडणुका होत असलेल्या गावांमधील वातावरण राजकीय बनले होते.
राजकारणातून गावातील सौहार्दाचे वातावरण बिघडू नये यासाठी अनेक गावातील ज्येष्ठांनी आणि नेत्यांनी बिनविरोधचाही नारा दिला होता. मात्र त्याला केवळ चार गावांनी प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
यामध्ये आंबी खालसा, निमगाव टेंभी, निमगाव बु. व भोजदरी या चार ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिकांनी एकत्र येवून जून्या-नव्यांचा ताळमेळ बसवित यंदाची निवडणूक बिनविरोध केली.
आता उर्वरीत ९० ग्रामपंचायतींमधील २८७ प्रभागातील ६९६ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असून त्यासाठी १ हजार ४८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.