Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरवणारी अत्यंत मोठी दुर्घटना समोर आली आहे. स्लरी निर्मितीसाठी केलेल्या विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. यातील चौघे एकाच कुटुंबातील आहेत.
ही घटना नेवासा तालुक्यातील वाकडी याठिकाणी मंगळवारी (दि.९) दुपारी घडली. माणिक गोविंद काळे (वय ६५), संदीप माणिक काळे (३६), अनिल बापूराव काळे (५८), विशाल अनिल काळे (२३), बाबासाहेब पवार (३५, सर्व रा. वाकडी, ता. नेवासा) अशी मृतांची नावे आहेत.
नेमकी घटना काय घडली ?
शेतातील घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत मंगळवारी दुपारी एक मांजर पडले. त्याला काढण्यासाठी सुरुवातीला एकजण विहिरीत उतरला. त्यांना विहिरीतून बाहेर येता येईना. म्हणून दुसरा उतरला. त्यानंतर इतर तिघेही विहिरीत उतरले.
त्यांचा बुडून मृत्यू झाला. विहिरीत स्लरी बनविण्यासाठी गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ टाकण्यात आले होते अशी माहिती आहे. त्यामुळे गॅस तयार झाला. तो नाकातोंडात जाऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
शेणामुळे तयार झालेला विहिरीतील गाळ काढणे सक्शन पंपाने शक्य नसल्याने गळ टाकून मृतदेह काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यात जखमी झालेले विजय माणिक काळे (३५) यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत चौघे एकाच कुटुंबातील
विहिरीत पडलेले मांजराचे पिल्लू काढण्यासाठी सर्वांत आधी विशाल काळे विहिरीत उतरला. विहिरीतील वासाने तो गुदमरून मरण पावला. त्याला वाचवण्यासाठी इतर उतरले असता तेही गुदमरून मरण पावले. माणिकराव काळे यांचा यात मृत्यू झाला.
त्यांचा मुलगा संदीप, पुतण्या अनिल, पुतण्याचा मुलगा विशाल असे चौघे हे एकाच कुटुंबातील आहेत. माणिकराव यांचा दुसरा मुलगा विजय वाला उपचारासाठी दाखल केले आहे. मृत पवार हा त्यांच्याकडे कामाला होता.